डॉ. भारती सुदामे

डॉ. सुनंदा पालकर हे नाव शिक्षण क्षेत्रात जाणकारां साठी नवीन नाही. शिक्षणाची नवनवीन क्षेत्रं पादाक्रांत करत स्वतःला अद्ययावत ठेवण्याचा त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.1974 पासून अध्यापनाच्या क्षेत्रात आलेल्या सुनंदाताईचा प्रवास अजूनही, पंच्याहत्तरी उलटून गेल्यावरही पस्तीशीच्या उत्साहानं सुरू आहे. अनेक शिक्षणसंस्थांशी, शैक्षणिक चळवळींशी, शैक्षणिक नियतकालिकांशी असलेले त्यांचे संबंध अधिकाधिक दृढ होताहेत. आज या ई-बुकच्या निमित्तानं तंत्रज्ञानाच्या नव्या जगात त्या प्रवेश करताहेत, खूपआनंद, मनापासूनसमाधान आणि त्यांचा अभिमान वाटतो आहे.

‘जी लाईफ’शी त्यांचा निकटचा संबंध. या संस्थेच्या कितीतरी तात्त्विक बाबींमध्ये आणि प्रात्यक्षिक क्षेत्रात सुनंदाताईचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्याच वेबसाईडवर हे पुस्तक असणार ही खूपच आनंदाची गोष्ट आहे.

2020 या वर्षी, कोविडच्या सावटाखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची योजना आपल्या पर्यंत पोहोचली आणि एकावेगळ्या विषयावर सर्वांचं विचारमंथन तसंच बुद्धिमंथन सुरू झालं. या विचार प्रवाहा पासून सुनंदाताई दूर राहणं शक्यच नव्हतं.त्यांनी ताबडतोब या विषयावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि या नवीन शासकीय धोरणाचीआमूलाग्र चिकित्सा करून त्यावर विचार करून त्या विचारांना मूर्तरूपही दिलं, तेच आज आपल्या पुढे प्रस्तुत आहे.

आकर्षक मुखपृष्ट, आशया नुरूप चित्रं, आवश्‍यक त्या ठिकाणी तक्ते, आकृत्या आणि विशिष्ट संकेत देऊन पुस्तकाचं केवळ रूप नव्हे तर त्याची मौलिकता देखील अनेक पटीनं सुनंदाताईनी वृद्धींगत केली आहे.

शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेत ला एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे, ज्याच्या प्रभावी आणि परिपक्व व्यक्तिमत्त्वाचा ठसा, विद्यार्थ्याच्या अपक्व आणि विकसनशील व्यक्तिमत्त्वा वर पडत असतो. कितीही आभासी किंवा तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण असो शिक्षकाला वगळून त्याच्या पूर्णत्वाची शक्यता कमीच. प्रत्यक्ष असोवा अप्रत्यक्ष, शिक्षक हा आवश्‍यक घटक आहे. या आवश्‍यक घटकाचा प्रभाव जाणून, त्याने म्हणजेच शिक्षकाने स्वतःच, साकल्याने विचार करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व आणि ज्ञान अद्ययावत ठेवणं, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्वतःला ‘अपडेट’ ठेवणं, हे त्याच्यासाठी कायमच आवश्‍यक ठरलं आहे. हेच कार्य डॉ. सुनंदा पालकर यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून आजच्या  शिक्षकांसाठी केलं आहे.

कन्येला आणि जावयाला, अधिक मासाचं वाणद्यावं तसं अर्पण केलेलं हे छोटेखानी पुस्तक. ई-बुकच्या स्वरूपातही अत्यंत आकर्षक आहे. 11 प्रकरणं आणि परिशिष्ट असलेलं हे पुस्तक 118 पानांचं आहे. त्याची आकर्षकता त्याच्या स्वरूपात आहे, वाचकांनी स्वतःच अनुभवावं.

नव्या युगाचं बालक, जन्मतःच पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करत असतं. हे बालक जेव्हा विद्यार्थी म्हणून शिक्षकाच्या ताब्यात येतं तेव्हा अनेक गुणावगुणांचा समुच्चय  असलेलं असतं. अशा बालकांवर शिक्षकाच्या नात्यानं संस्कार करायचे असतील तर शिक्षकानं त्याच्याही पुढच्या पिढीत पोहोचायला हवं अन्यथा त्याच्या क्षमतेबाबत समाज, विद्यार्थ्यांचे पालक आणि सामान्य जनच नव्हेतर स्वतः विद्यार्थी सुद्धा साशंक असेल.

या सगळ्या अयामांचं भान ठेवून, डॉ.सुनंदा पालकर यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. प्रथम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्पष्ट करून नंतर त्या धोरणाची शिक्षका कडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पुढील सर्व प्रकरणां मध्ये त्या अपेक्षापूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी काय करावे याचे मार्गदर्शन आहे. शिक्षणक्षेत्रातल्या आपल्या अनेक वर्षांच्या दीर्घ अनुभवा वरून, नव्याजुन्या शैक्षणिक विचार प्रवाहाच्या अभ्यासातून आणि अद्ययावत विचारांच्या मंथनातून लेखिकेने या विषयाची मांडणी केलेली आहे. या सर्वाचा परिपाक म्हणजेच वाचकांच्या हाती, त्यांच्या मोबाईलच्या स्क्रिनवर उपलब्ध असलेलं हे पुस्तक.

‘जी-लाईफ भारत’ या संगठनेच्या अध्यक्ष असलेल्या सुनंदाताई कायम नवनवीन प्रयोग करत असतात. त्याच प्रयोगातून निर्माण झालेला हा एक नवा उपक्रम किंवा प्रकल्प म्हणूयात, यशस्वी होऊन त्यांना अमाप यश मिळवून देईल याचा मला विश्वास आहे. त्यांच्या या आणि या पुढील सर्व उपक्रमांना आणि वाटचालीला मी सुयश चिंतते.

डॉ. भारतीसुदामे
निवृत्तप्राचार्य, सिंहगड कॉलेज ऑफ एज्युकेशन, नऱ्हे-आंबेगाव, पुणे.
भ्रमणध्वनी – 9422125956